तुळजाभवानी मंदिर
तुळजाभवानी मंदिर
मंदिर हे महाराष्ट्रातील तुळजापूर येथील एक हिंदू मंदिर आहे. तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी येत असत.तुळजापूर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांमधील आद्य पीठ मानले जाते. देवी भागवतात तुळजापूरचा उल्लेख भारतातील ५१ शक्तिपीठांमध्ये केलेला आहे.महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवतुळजाभवानीता, अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे.
स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात श्री तुळजाभवानीची अवतार कथा आहे. कृतयुगात कर्दम ऋषीपत्नी अनुभूती तपस्येत असताना, कूकर या दैत्याने तिचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला. तपस्वी अनुभूतीने पावित्र्य रक्षणासाठी देवी भगवतीचा धावा केला. देवी भगवती साक्षात प्रगटली व कूकर या दैत्याशी युद्ध करून त्याचा वध केला. साध्वी अनुभूतीच्या विनवणीवरून देवी भगवतीने या पर्वतराईत वास्तव्य केले. भक्ताच्या हाकेला त्वरित धावून येणारी व मनोरथ पूर्ण करणारी म्हणून ही देवी त्वरिता-तुरजा-तुळजा तुळजाभवानी (भवानी) या नावाने ओळखली जाते.
महाराष्ट्रातील तुळाजापूर (जि. उस्मानाबाद) हे भवानीचे प्रख्यात असे क्षेत्र असून येथील तुळजाभवानी अनेकांचे कुलदैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचीही तुळजाभवानी कुलस्वामिनी होती. भवानी तलवार त्यांना साक्षात तुळजाभवानीनेच दिली होती, अशी आख्यायिका आहे.
तुळजापूर मंदिराची माहीती
तुळजापूर येथील मुख्य आकर्षण म्हणजे तुळजाभवानीचे मंदिर. हे मंदिर बालाघाट डोंगररांगेतील ‘यमुनाचल’ नावाच्या डोंगरावर बांधलेले आहे. रा. चिं. ढेरे यांच्या मते, ‘यमुनाचल’ हे पर्वतनाम ‘यम्मन गुड्ड’ (यमाईचा डोंगर) या कन्नड नावाचे संस्कृतीकरण असावे. सध्याच्या तुळजाभवानी मंदिरात मूळ जुन्या मंदिराचे काही अवशेष दिसून येतात. मंदिराच्या सभामंडपातील काही स्तंभ, तसेच मंदिर परिसरातील इतर प्राचीन अवशेषांवरून हे मंदिर साधारणतः १३ व्या शतकात बांधले असावे, असे दिसते. सध्या गर्भगृह, सभामंडप, होमकुंड, कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ इ. स्थापत्य मंदिर परिसरात दिसते. देवीचे मंदिर हे दगडी प्राकाराने बंदिस्त असून, त्याच्या पूर्व आणि पश्चिमेस उंच कमानींची भव्य प्रवेशद्वारे आहेत. प्राकाराला लागून असणाऱ्या ओवर्यांत विभिन्न परिवारदेवता आहेत. साधारणतः अठराव्या शतकात मंदिराच्या बांधणीत निजामाचे सरदार व निंबाळकर घराण्याचे मोठे योगदान असल्याचे येथील वास्तुस्थापत्यावरून दिसून येते. निंबाळकर दरवाजाच्या बाहेरील भागात दोन्ही बाजूंना ‘मातंगी देवी’ व ‘भैरवा’ची मंदिरे आहेत. ही मंदिरे त्यांच्या स्थापत्यरचनेवरून साधारणतः चौदाव्या शतकात बांधली असावीत, असे दिसते.
येथील मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजास ‘परमार’ दरवाजा म्हणतात. अष्टभुजा महिषासुरमर्दिनी असे देवीचे मनोहर रूप आहे. देवी भवानीची ही स्थलांतर करता येणारी मूर्ती आहे. वर्षातून तीनवेळा ही मूर्ती मंचकी (पलंगावर) विसावते. असे इतरत्र कोठेही आढळत नाही. गर्भगृहाच्या भिंतीवर छोटी-छोटी आकर्षक शिल्पे आहेत. सभामंडपात उत्तरेस देवीचे शयनगृह असून इथे चांदीचा पलंग आहे.
मुख्य मंदिर
मंदिरात प्रवेशासाठी राजा शहाजी व राजमाता जिजाऊ यांच्या नावे दोन द्वारे आहेत. मुख्य दाराच्या पहिल्या माळ्यावर श्री संत ज्ञानेश्वर धार्मिक ग्रंथालय व श्री संत तुकाराम धार्मिक ग्रंथालय आहे. ग्रंथालयांना लागूनच श्री समर्थ विशेष हे विश्रामगृहही आहे. महाद्वारातून प्रवेश करताना आपणास तुळजा भवानी मंदिर न्यासाचे कार्यालय व राजा शाहू प्रशासकीय सदनाच्या कार्यालयांसोबतच भारतीय स्टेट बँक व उपडाकघरही दृष्टीस पडते. मंदिरात नारळ फोडण्यास मनाई आहे. मंदिराच्या छायाचित्रणाची परवानगी नाही.
पायर्या उतरल्यावर उजव्या हातावर गोमुख तीर्थ तर डाव्या हातावर कल्लोळ तीर्थ दृष्टीस पडते. भवानी मातेच्या दर्शनाअगोदर भाविक या पवित्र तीर्थात स्नान करतात. मंदिराच्या आवारातच अमृत कुंड व दुध मंदिर आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या हातावर सिद्धीविनायक मंदिर आहे तर उजव्या बाजूस आदिशक्ती, आदिमाता मातंगीदेवीचे मंदिर आहे. माता अन्नपूर्णेचे मंदिरही येथेच आहे.
मंदिराचे वैशिष्ट्य
देवी मंदिराच्या मागच्या बाजूस काळा दगडाचा चिंतामणी असून तो गोल आकाराचा आहे. आपले काम होईल की नाही याचा कौल हा चिंतामणी देतो. शिवाजी महाराजही युद्धाला जाण्यापूर्वी मातेचे दर्शन घेऊन चिंतामणीकडे कौल मागत असत. एक रुपयाचे नाणे ठेवून चिंतामणी उजवीकडे फिरल्यास काम होणार व डावीकडे फिरल्यास काम होणार नाही असे समजले जाते. चिंतामणीच्या बाजूलाच देवीच्या अलंकाराचा खजिना, देवीची वाहन ठेवण्याची जागा आणि गुप्तदान कुंडी आहे. देवीच्या अलंकारामध्ये अस्सल सोन्याच्या माळा, हिर्या मोत्यांचे दागिने, जुडवा, कंबरपट्टा, सूर्यहार, चंद्रहार, रत्नहार, चिंचपेटा व रत्नजडित खडावा आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी देवीस सोन्याची माळ अर्पण केली आहे. या माळेच्या प्रत्येक पुतळीवर राजे शिवछत्रपती अशी अक्षरे कोरली आहेत. नवरात्रोत्सवात मुख्य सणांच्या दिवशी, पाडवा, दसरा, दिपावली आदी प्रसंगी देवीस संपूर्ण अलंकार घातले जातात. मुख्य मंदिरासोबतच गोमुख तीर्थ, श्रीकल्लोळ तीर्थ, मंकावती तीर्थ, पापनाशी तीर्थ भक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतात. याशिवाय महंत भारतीबुवांचा मठ, महंत बाकोजीबुवांचा मठ, हमरोजी बुवा मठ, अरण्य गोवर्धन मठ संस्थान, महंत गरीबनाथ मठ तुळजापुरात आहेत.
तुळजापुर (tuljapur) मूळ नाव चिंचपूर
तुळजापूरचं मूळ नाव चिंचपूर. यमुनाचल प्रदेशातील चिंचपूर भागातील एका दरीत तुळजाभवानीचं ठाणं असून मंदिराची मूळ बांधणी किल्लेवजा असून मंदिर हे हेमाडपंथी शैलीतील आहे. प्राचीन काळी तुळजापुरात मोठय़ा प्रमाणावर चिंचेची झाडं असल्याचा संदर्भ सापडत असला तरी आज तेथे हे झाड दिसणं दुर्मीळ झालं आहे.
तुळजापूरच्या तुळजाईच्या रूपाचे वर्णन
तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहातील देवी ही अष्टभुजा महिषासूरमर्दिनीच्या रूपात आहे. प्रतिमा एका उंच पीठावर विराजमान असून, तिच्या मस्तकावरील मुकुटावर सयोनी-लिंग आहे. हातात त्रिशूळ, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र धारण केलेले आहे. पाठीवर बाणांचा भाता आहे. डावा पाय भूमीवर टेकलेला असून, उजवा पाय महिषासुराच्या शरीरावर दाबलेला आहे. देवीमुखाच्या उजव्या-डाव्या बाजूंना चंद्र-सूर्य कोरलेले आहेत. महिषासुराच्या धडाच्या उजवीकडे सिंह हे देवीचे वाहन आहे; त्याच्या खालच्या भागात एक ऋषी आणि डावीकडे एक तपस्वी आहे. देवीमूर्तीवर चक्राकार कुंडले, केयूर, अंगद, काकणे, कंठा, माला, मेखला आणि साखळ्या कोरलेल्या आहेत. ग. ह. खरे यांच्या मते, ही मूर्ती सतराव्या-अठराव्या शतकात घडविलेली असावी.
तुळजापूरच्या तुळजाई देवीचे कोरीव उल्लेख
तुळजापूर व तुळजाभवानी संबंधित माहिती काही कोरीव लेखांद्वारेही प्राप्त होते. ‘अंबादेवी’ असा उल्लेख असलेला तुळजापूर परिसरातील महामंडलेश्वर कदंब मुरुडदेवच्या काळातील (इ. स. ११६४) एक शिलालेख काटी-सावरगाव या गावी सापडला आहे. तुळजाभवानी संबंधित सर्वांत जुना शिलालेखीय स्पष्ट निर्देश तुळजापूर तालुक्यातील ‘काटी’ येथे १३९७ (शके १३२०) सालच्या एका शिलालेखात पहावयास मिळतो. या शिलालेखात ‘परसरामाजी गोसावी’ (संभवतः दसनामी गोसावी) नावाच्या व्यक्तीचा तुळजापूरच्या यात्रेस आल्याचा उल्लेख देखील आहे. तुळजाभवानी मातेला एकशे एक मोहरांची माळ अर्पण केली गेली होती. तिच्यातील प्रत्येक पुतळीवर ‘श्री राजा शिव छत्रपती’ व ‘श्री जेगदंबा [प्रसन]’ ही अक्षरे कोरण्यात आलेली आहेत. सदर माळ छत्रपती शिवाजी द्वितीय किंवा छत्रपती शिवाजी तृतीय यांनी देवीला अर्पण केली असावी, असे अमोल बनकर यांचे मत आहे. उर्वरित उपलब्ध सर्व कोरीव लेख शिवोत्तर काळातील आहेत. त्यामध्ये अहिल्याबाईंच्या विहिरीतील लेख, धाकट्या तुळजापुरातील तुळजामातेच्या पादपीठावरील लेख, मंकावती गल्लीतील शिलालेख इ. शिलालेखांचा समावेश होतो.
तुळजापूरचा एक उल्लेख (इ. स. १७६५) औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील बिलोणी या गावी तुकाई मंदिरासमोरच्या दीपमाळेवर दिसून येतो. तुळजाभवानी मंदिराच्या दक्षिणेकडील पितळी प्रवेशद्वारावर १८८१ चा एक प्रदीर्घ रजतलेख आहे. ह्यात एक स्तोत्र असून याची रचना मध्य प्रदेशातील देवासच्या पवार घराण्यातील राजपुरुष ‘नारायणराव पवार’ यांनी केली होती.
जगदेव परमार या महान देवीभक्ताने आपले मस्तक सात वेळा देवीला अर्पण केले, अशी श्लोकरचना या दरवाजावर कोरली आहे. सभामंडपात पश्र्चिम दिशेला गर्भगृह असून चांदीच्या सिंहासनात, पूर्वाभिमुख अशी श्री तुळजाभवानी देवीची रेखीव व प्रसन्न मूर्ती आहे. मूर्ती गंडकी शिळेची असून प्रमाणबद्ध आहे.
आई तुळजाभवानी मातेचा पलंग, पालखी कोठून येते, कोण बनवीते ?
‘देऊळ-ए-कवायत’ नावाचा कायदावजा करार केला. त्यानुसार संस्थानसह पुजारी आणि मानकऱ्यांनी कोणत्या प्रकारच्या सेवा बजावाव्यात तसेच त्यांचे अधिकार आणि उत्पन्न स्पष्ट करण्यात आलेा असल्याने आजही मंदिराचा कारभार ‘देऊळ-ए-कवायत’ नुसारच चालविला जातो.
तुळजापुरातील पुजाऱ्यांचे वैशिष्टय़ म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या भक्ताची ते लेखी नोंद ठेवतात. त्यामुळे वंशपरंपरेने आपल्या कुलदेवतेचा पुजारी हा ठरलेला आहे. साहजिकच आपल्या वंशजांना इतिहास जाणूनघेण्याकरिता पुजाऱ्यांचे बाड उपयोगी ठरते. देवीचे पुजारी हे आपल्याकडे येणाऱ्या भक्ताची राहण्याखाण्याची व्यवस्था स्वत:च्या घरीच करतात हे वेगळेपण आहे.
तुळजापुरात कदम, मलबा, परमेश्वर, उदाजी, सोंजी याप्रमाणे भोपे पुजारी तर भोसले, मगर, क्षीरसागर, गंगणे, रोचकरी यांसारख्या नावाचे पाळीकर पुजारी एकमेकांचे पाहुणे असले तरी आजतागायत भोपे पुजाऱ्यांनी आपल्या मुलीचा विवाह गावातील तरुणाशी केलेला नाही.
मंदिर संस्थान आणि संस्थानकडून दानपेटीतील १६ टक्के हिस्सा मिळविणारे भोपे पुजारी असले तरी देवीचे अनेक पारंपरिक सेवेकरी विनामोबदला सेवा देतात. भक्ताला लाखोने देणारी देवी स्वत: मात्र पहिला नैवेद्य भाजी भाकरीचा स्वीकारते.
तुळजापूर (tuljapur) देवीचे उत्सव
श्री तुळजाभवानी मातेच्या नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रमणे साजरा केला जातो या नवरात्र काळात नऊदिवस पुजा , घटस्थापना करण्यात येते ,छबिना , श्री देवीस विविध प्रकारच्या अलंकार पुजा करण्यात येतात असे अनेक कार्यक्रम साजरे होतात . या उत्सवाला लाखोच्या संख्येने भाविक-भक्त तुळजापूर ला येतात.
शाकंभरी नवरात्र
हा उत्सव श्री देवीचा शाकंभरी नवरात्र म्हणून साजरा करण्यात येतो . या उत्सव मध्ये घटस्थपना करण्यात येते ,होमहवन ,जलयात्रा , अन्नदान , आणि अनेक प्रकारचे कार्यक्रम साजरे करण्यात येतात . श्री देवीस अलंकार पुजा करण्यात येतात या उत्सव पाहण्यासाठी लाखो भाविक देवीच्या दर्शनास येतात. हा उत्सव स्थनिक लोकांसाठी महत्वाचा आहे.
दसरा उत्सव
श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर मधील एक अदभूत असा दसरा उत्सव आहे. श्री तुळजाभवानी मातेची मुर्ती हि मंदिर परिसर मधील पिंपळाच्या पारावर आणून पालखी मध्ये ठेऊन मंदिर प्रद्क्षना करण्यात येते. भाविक हळदी कुंकू यांची उधळण श्री देवीच्या पालखीवर करतात हा उत्सवा मध्ये लाखो भाविक सहभागी होतात.
काळभैरव भेंडोळी उत्सव
काळभैरव भेंडोळी उत्सव हा जर वर्षी दिवाळीच्या नरकचतुर्दशी या वेळी स्थितीनुसार असतो , हा उत्सव पाहण्यासाठी हजोरो भाविक श्री तुळजाभवानी मंदिर मध्ये येतात .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा