श्रावण व्रत
श्रावण व्रत
द्वादशस्वपि मासेषु श्रावणो मेऽतिवल्लभ: । श्रवणार्हं यन्माहात्म्यं तेनासौ श्रवणो मत: ।।
श्रवणर्क्षं पौर्णमास्यां ततोऽपि श्रावण: स्मृत:। यस्य श्रवणमात्रेण सिद्धिद: श्रावणोऽप्यत: ।।
यायचा अर्थ श्रीशंकर म्हणतात मला सगळ्या महिन्यांमध्ये हा महिना सगळ्यात जास्त आवडता आहे.या महिन्यात नक्षत्र युक्त पौर्णिमा असते, त्यामुळे या महिन्याला श्रावण महिना असे म्हणतात.सगळे महात्मा लोक या महिन्यातच पूजाअर्चा करून विद्या आत्मसात करतात. महिन्यात चंद्र श्रवण नक्षत्रात जातो म्हणून या महिन्याला श्रावण महिना असे म्हणतात.
श्रावण महिन्यातील व्रत
सोमवार
चातुर्मासामधील सर्वात श्रेष्ठ महिना हा श्रावण महिना आहे. अनेक शिवभक्त श्रावणी सोमवारी उपवास करतात. एक वेळेस जेवण करून संध्याकाळी व्रत सोडण्याची रीत आहे. समुद्रमंथन झाल्यानंतर त्यामधून बाहेर पडलेले हलाहल विष शंकराने प्राशन करून मनुष्यांवरील धोका टाळला. त्यामुळे भगवान शंकराचे मनुष्य वर्गावर असलेले हे ऋण फेडण्यासाठी श्रावणी सोमवारी विशेष पूजा करून त्याच्याप्रती आदर व्यक्त केला जातो. अशी हिंदू धर्मियांची धारणा आहे.
मंगळवार
मंगळवार :- श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगलागौरीचे व्रत केले जाते. हे व्रत नवोढा (नवविवाहित) मुलींचे नित्य आहे. विवाहानंतर पाच किंवा सात वर्षे हे व्रत करतात. या व्रताच्या देवता शिव, गणेश यांच्याबरोबर गौरी आहे. पूजनाचा मंत्र ः पुत्रान् देहि धनं देहि सौभाग्यं देहि मङ्गले। अन्यांश्च सर्वकामांश्च देहि देवि नमोऽस्तु ते।। पूजन झाल्यावर या व्रताची कहाणी ऐकावी.
बुधवार
बुधवार :- महाराष्ट्रात श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुध-बृहस्पती पूजनाचे व्रत केले जाते. बुध-बृहस्पतीचे (गुरू) चित्र घेतात किंवा रेखाटतात. त्याची पूजा करतात. दहीभाताचा नैवेद्य दाखवितात. सात वर्षांनंतर काही स्त्रिया याचे उद्यापन करतात.
गुरुवार
गुरुवार :- श्रावण महिन्यातील प्रत्येक गुरुवारी बृहस्पतीपूजन करण्यास सांगितले आहे. यांची देवता बृहस्पती (गुरू) आहे.
शुक्रवार
शुक्रवार :- श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जिवंतिका पूजन करण्यास सांगितले आहे. ही बालसंरक्षक आहे. पहिल्या शुक्रवारी केशर किंवा गंधाने भिंतीवर जिवंतिकेचे चित्र काढतात. आता सर्वत्र छापील चित्र मिळते. जिवंतिकेचे ध्यान असे आहे : जरे जिवन्तिके देवि बालयुक्ते प्रमोदिनि। रक्षाव्रते महाशक्ति पूर्णकामे नमोऽस्तुते।। जिवंतिकेची पूजा करून देवीला ओवाळतात व देवीची प्रार्थना करतात- ‘अक्षतां निक्षिपाम्यम्ब यत्र मे बालको भवेत्। तत्र त्वया रक्षणीयो जीवन्ति करुणार्णवे।।’ हे करुणामयी माते, मी जिकडे अक्षता टाकते, त्या दिशेला असणाऱ्या माझ्या बालकाचे तू रक्षण कर. आपल्या इकडे जरा-जिवंतिका म्हणतात. यात जरा ही देवीसुद्धा बालकांचे रक्षण करणारी आहे.
शनिवार
श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे, असे मानले जाते. पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पीडांचा परिहार होतो असा समज आहे.
रविवार
रविवार :- श्रावणातील प्रत्येक रविवारी गभस्ति नावाच्या सूर्याचे पूजन करण्यास सांगितले आहे. हे पूजन मौनाने करावे, असेही शास्त्रात सांगितले आहे.
शिवलिलामृृत पारायण
भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे . या पोथीचे परायण करण्याच्या अनेक पद्धती आहेत त्या खालीलप्रमाणे.
*एक दिवसीय पारायण*
सोमवारी पंधरा अध्यायांचे एक संपूर्ण पारायण करावे . स्नान केल्यानंतर एकांतात पवित्रपणे बसून शिवाची पूजा करून पारायण करावे. मद्य, मांस भक्षण करू नये . पारायण चालू असता सात अध्यायानंतर घटकाभर विश्रांती घ्यावी . त्या अवधीत देह धर्म आवरावे. दूध, फळे भक्षण करावीत. हात, पाय, तोंड स्वच्छ धुवून पुन्हा आसनस्थ व्हावे आणि पाठ पूर्ण करावा . पारायणानंतर *ॐ नमः शिवाय* या षडाक्षरी मंत्राचा १०८ वेळा रुद्रमालेवर जप करावा .
फल - इष्ट कामना पूर्ण होतील .
*सप्ताह-पारायण पध्दति*
सोमवारी पंधरा अध्यायांचे एक संपूर्ण पारायण करावे . रोज एक पारायण याप्रमाणे ७ दिवस ७ पारायणे करावीत .नियम - वरील प्रमाणे .
फल - सर्व इष्ट कामना पूर्ण होवून गंडांतरे, रोग, मृत्यु, पाप, ऋण, दारिद्र्य, संकटे, कोडासारखे असाध्य रोग, बंधन इ. टळतील . आयुष्य, धन, संतती वाढेल, तुष्टी पुष्टी मिळेल. हे सर्व मिळून शेवटी शिव-सायुज्यता मिळेल .
*सप्ताह-पारायण पध्दति २*
कोणत्याही सोमवारी सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन ११ बेलाची पाने पिंडीवर वहावीत व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन ” मी शंकराना प्रसन्न करून शांति, समाधान, आनंद ( जी इष्ट कामना असेल ती बोलून ) प्राप्त करण्यासाठी श्रीशिवलीलामृत पोथीचे ७ दिवसात पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान् श्रीशंकरानी कृपा करून पूर्ण करून घ्यावे.” अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वत:च्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी. शूचिर्भूत असावे.सोमवार – अध्याय १ व अध्याय २
मंगळवार – अध्याय ३ व अध्याय ४
बुधवार – अध्याय ५ व अध्याय ६
गुरुवार – अध्याय ७ व अध्याय ८
शुक्रवार – अध्याय ९ व अध्याय १०
शनिवार – अध्याय ११ व अध्याय १२
रविवार – अध्याय १३ व अध्याय १४
रविवारी रात्री १५ वा अध्याय वाचला तरी चालेल न वाचला तरी चालेल. रविवारी रात्रीच्या आपल्या जेवणाच्या पात्राचा नैवेद्य शंकराला दाखवावा व तेच उद्यापन समजावे. पारायण करताना दीवा तेवत ठेवावा. रविवारी शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ति तांदूळ व पैसे ठेवावेत. शैव संप्रदायी साधूला कमीत कमी २१ रु. दक्षिणा व पांढरेशुभ्र वस्त्र दान द्यावे. पोथी मोठयाने वाचली तरी चालेल. इतरांनीही ऐकावी. रविवारी वाचन पूर्ण झाल्यावर १०८ वेळा *'ॐ नम: शिवाय'* या मंत्राचा जप करावा ( जमल्यास रोज जप करावा ).
*अकरावा अध्याय वाचन*
फक्त अकरावा अध्याय रोज तीनदा वाचावा . नियम प्रथम पद्धतीत दिल्याप्रमाणे .फल - आयुष्य संतती लाभेल . अभक्ष्यभक्षण, मद्यपान, ब्रह्महत्यादी महापापे नष्ट होतील . एक सहस्त्र कपिला गायी दान केल्याचे पुण्य मिळेल.
*अकरावा अध्याय श्रवण*
अकराव्या अध्यायाच्या केवळ श्रवणानेही एकादश रूद्र प्रसन्न होतात आणि रुद्रपाठाचे पुण्य मिळते.*बेचाळिस ओव्या पठण*
ग्रंथाच्या शेवटी दिलेल्या बेचाळिस ओव्यांचे नित्य पठण केले जाते . ज्यांना वेळेअभावी वा इतर काही कारणांमुळे ग्रंथ पठण करता येत नाही त्यांच्यासाठी ह्या ओव्या कामी येतात. रोज सकाळी स्नान करून ह्या ४२ ओव्या वाचाव्यात .फल - सर्व ग्रंथांचे पठण केल्याचे पुण्य मिळते.
या सर्व उपासनेत नित्य नियम पाहिजे . दुर्जनांचा संग टाळावा . चित्त शांत असावे . विकल्प धरु नये . श्रद्धा ठेवावी. संकल्प करून पठणास प्रारंभ करावा , येत नसल्यास गुरुजींकडून संकल्प करून घ्यावा. शास्त्रोक्त पद्धतीने शिवलिंगाची वा शिवप्रतिमेची पूजा करावी. सर्व उपासना गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली व व्रतस्थ राहून करावी.
शिवरात्रीचा उपवास, शिव पूजन, शिव दर्शन, त्या दिवशी शिव मंत्रजाप, शिवलीलामृत पारायण यांनी सर्व कामनापुर्ती होते व शिवसायुज्य मिळते अशी परम्परागत फलश्रुती प्रसिद्ध आहे .
बेलाची पाने, पांढरी फुले, दूध, शुद्ध जल, दही-भाताचा नैवेद्य ह्या साऱ्या गोष्टी शंकराला प्रिय मानल्या जातात. त्यामुळे यांचे शिवपुजेत फार महत्त्व आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा