पंढरपुरच्या‌ वारीचा इतिहास 🚩

🚩पंढरपुरच्या‌ 

वारीचा इतिहास 🚩

वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असणाऱ्या पांडुरंगाच्या परम पावन वास्तव्याने पुनीत झालेल्या पंढरपूर या नगरीचेही महात्म्य निराळेच आहे. पंढरपूर हे कधी वसले गेले किंवा ते कधीपासून अस्तित्वात आहे? याबाबतची उत्सुकता अनेकदा व्यक्त होते.
वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते.


पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरी होणारा एक मोठा सणच. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती. आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात, आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. गेली दोन वर्ष करोनामुळे ही वारी होऊ शकली नाही. पण जणू आपली जन्मदात्री माऊलीच आपल्याला भेटली नाही इतकी खंत सर्वांना लागली. पण यंदा हे मळभ दूर झालं आणि वारीचा मार्ग मोकळा झाला.
वारकरी संप्रदायातील आचारधर्म हा तात्विक धारणेतून निर्माण झालेल्या नीतिशास्त्रातून स्वाभाविकपणे आकारास आला आहे, म्हणूनच या आचारधर्मात कोठेही कर्मकांड निर्माण झाल्याचे आपल्याला दिसत नाही, या संप्रदायातील भगवद्भक्तांच्या आचरणाचा विचार केला तर असे लक्षात येते, की सर्वच संतांनी विठ्ठल हेच हरी आणि हर यांचे ऐक्य प्रतीक असल्याचा जो संस्कार केला आहे, त्यामुळे या संप्रदायामध्ये भेद दूर होऊन समत्वदृष्टी निर्माण झाली आहे. एकदा का ही समत्व दृष्टी निर्माण झाली, की मग आपोआपच प्रेम, बंधुता या गोष्टी सहजपणे आचरणात यायला लागतात. प्रा.र.रा.गोसावी आपल्या संशोधनपर ग्रंथात याच पद्धतीचे मत व्यक्त करतात, विश्वबंधुत्व समत्व आणि प्रीती या तीन तत्त्वातून वारकर्‍यांचा आचारधर्म उदयास आला आहे. वारकरी संप्रदायातील आचार धर्म हा कर्मकांड जरी नसला तरी सहज करण्यायोगे, आचरण्याजोग्या काही गोष्टी मात्र या संप्रदायात निश्चित आहेत. रामकृष्णहरी हा मंत्र जप, गळ्यात तुळशीची माळ धारण करणे, कपाळ व शरीराच्या इतर भागावर गोपीचंदाचा वापर करून मुद्रा धारण करणे, एकादशी दिवशी उपवास करणे व पंढरपूर - आळंदीची वारी करणे अशा गोष्टी वारकरी म्हणवणाऱ्याने कराव्यात अशी अपेक्षा ठेवली गेली आहे, यासाठी आग्रह धरला जातो परंतु सक्ती केली जात नाही, त्यामुळेच हा आचारधर्म कर्मकांड ठरत नाही.
 'महाराष्ट्रात असंख्य प्रथा आहेत पण ही 'पंढरीची वारी' म्हणजे प्रथा नाही तर आपल्या विठ्ठलाप्रती मनोभावे केलेली उपासना आहे. जी अखंड आणि अभंग सुरू आहे.' या शिवाय वारी म्हणजे काय, ती का करावी, त्याचा उद्देश काय आणि वारी विषयी तुम्हाआम्हाला माहीत नसलेल्या असंख्य गोष्टी लेखात  सांगितल्या आहेत. पण त्या जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर खालील लेख वाचा.


पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती.त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो.ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मल्लप्पा वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली.संत तुकाराम महाराज यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा होती.



।।जेव्हा नव्हते चराचर | तेव्हा होते पंढरपूर ॥

असे जरी म्हटले जात असले तरी पंढरपूर हे स्थान इसवीसनाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या शतकापासून ओळखले जाते, या स्थानाला लोहान क्षेत्र, पौंडरिक क्षेत्र, पंडरंगे, पांडुरंग पल्ली, पांडुरंगपूर, विठ्ठलवाडी, भांडरंग वट्टीग, फागनीपूर, पंढरी, पंढरपूर या विविध नावांनी ओळखले जाते, त्याच बरोबर शैवक्षेत्र महायोगपिठ म्हणून देखील इसवीसनाच्या पहिल्या दुसऱ्या शतकात हे स्थान प्रसिद्ध होते. अशा या पंढरी नगरीच्या ओढीने समस्त वारकरी व विठ्ठल भक्त पंढरीची वारीमध्ये चालताना दिसून येतात.                वारकऱ्यांचे आराध्य दैवत श्री विठ्ठल या देवतेला विठ्ठल हे नाव कसे प्राप्त झाले, विठ्ठल या शब्दाची व्युत्पत्ती काय?

१) विष्णू - विष्ट - विठू- विठ्ठल अशी व्युत्पत्ती दाखविली जाते.

) इटु - कटिकरन्यस्त-कमरेवर हात ठेवलेला देव असा तामिळी भाषेतील शब्द आहे, त्यावरून झटु - इठु- इटुबा -इठुबा -विठोबा ही एक व्युत्पती.

३) धर्मसिंधूकार बाबा पाध्ये यांच्या मते, वि.दा. ज्ञानेन, ठा ण शुन्यात, ला ति गुहाती म्हणजे ज्ञानाने जे शून्य आहेत म्हणजेच जे अज्ञानी आहे त्यांचेही ग्रहण करणारा म्हणजे त्यांनाही आपले पायाशी आश्रय देणारा तो विठ्ठल.

 ४) पुंडलिकाच्या प्रचलित कथेतील अख्यायिकेवरून विटेवर उभा तो विठोबा.

५) विचा केला ठोबा तोचि झाला विठोबा II 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महालक्ष्मी मंदिर(अंबाबाई) कोल्हापूर

औंढा नागनाथ

जगातील एकमेव मंदिर महाराष्ट्रात जिथे महादेवा समोर नंदी नाही...